वर्षभर पाण्याची मिटली चिंता : पालिकेने सोडला सुटकेचा विश्वास
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची जीवनदाहिनी म्हणून ओळखला जाणारा जवाहर तलाव गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी (ता.८) रात्री तलावाची ४६ फुट ६ इंच पाणी पातळी झाली आहे. सांडव्यावर बरगे घातल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. तलावाच्या पाणीपातळीत बरग्यामुळे आणखीन वाढ होत आहे. शिवाय कमी जास्त प्रमाणात पाणी सांडव्यावरून खाली येत आहे. मंगळवारी दिवसभरात तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो त्यामुळे निपाणी वासीयांचा वर्षभराचा पाणी प्रश्न निकालात निघाला असून तालुका प्रशासनाने सुटकेच्या निश्वास सोडला आहे.
जून महिन्याच्या अखेरपासून निपाणी परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. तेंव्हापासून जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. दोन दिवसापूर्वी पाणी पातळी ४३ फुटांवर होती. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या डोंगर भागातून ओढ्यांचे पाणी तलावात येवून मिसळत आहे. त्यामुळे झपाट्याने पाणी पातळीत वाढ
झाली आहे. गतवर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने २२ जुलै रोजी जवाहरलाल तलाव ओसंडून वाहू लागला होता. यंदा तलावातील पाणी पातळी कमी असल्याने गेल्या महिन्यापासून निपाणी पालिकेकडून शहर व उपनगराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.
निपाणीचा शहराचा जीवनदाता म्हणून जवाहर तलाव ओळखला जातो. तलावाची ४६ फुट १ इंच पाणी पातळी झाल्यानंतर पश्चिमेकडील सांडव्यातून पाणी बाहेर पडते. मात्र यावर्षी सांडव्यावर बरगे घातल्याने गतवर्षीपेक्षा तलावातील पाणीपातळी वाढली आहे. हा तलाव ओव्हरफ्लोच्या मार्गावर असल्याने शहरवासीयांच्या वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला आहे. त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होण्यासाठी अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र आता २ दिवसांच्या दमदार पावसाने तलाव पुर्णपणे भरला आहे.
४० फुटांपेक्षा अधिक वाढ झाल्यावर दोन दिवसाआड पाणीपुरवठा यमगर्णी येथील वेदगंगा नदीच्या पाण्याचा उपसा जॅकवेलमधील २७५ अश्वशक्तीच्या मोटारीद्वारे जवाहर तलावाच्या जलशुद्धीकरण घटकात घेऊन पाणी फिल्टर केले जात आहे. पाणी पातळीत चाळीस फुटांपेक्षा अधिक वाढ झाल्यामुळे तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड होण्याची शक्यता आहे.
——————-
आता गंगापूजनकडे लक्ष
जव्हार तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तो पाहण्यासाठी शहर व परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. आता पालिका प्रशासनातर्फे तलावातील पाण्याचे पूजन होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.