निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.10) दिवसभर येथील बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी झाली होती.
गुरुवारी (ता.11) सकाळी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील युवती व महिलांनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून हा सण साजरा केला. यावेळी भावाकडूनही बहिणीला मोबाईल व इतर साहित्याची भेट देण्यात आली. दिवसभर गोड गोड अन्नाचा आस्वादही कुटुंबामधील सदस्यांनी घेतला. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसापासून निपाणी बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे हजारो रुपयांची उलाढाल झाली. गेल्या दोन वर्षापासून कोरोना असल्याने या सणावर विरजण पडले होते. मात्र आता संसर्ग कमी झाल्याने प्रत्येक घरात हा सण आनंदाने साजरा करण्यात आला.
येथील कोडणी – निपाणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम शाळेमध्ये मुलांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. भारतीय सणांची माहिती मुलांना व्हावी, सामाजिक बांधिलकीची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, या उद्देशाने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा झाला.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या राख्या बनविल्या होत्या. राखी पौर्णिमेच्या दिवशी शाळेतील मुलींनी सर्व मुलांना राख्या बांधून ओवाळून रक्षा बंधन साजरा केला. संस्थेच्या संचालिका चेतना चौगुले यांनी भारतीय संस्कृतीतील सर्व सणाबाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका स्वाती पठाडे, निकिता ऐवाळे, पूजा वसेदार, शिल्पा तारळे, ज्योती चवई, साधना आर. नाझनीन, भाग्यश्री शिंदे, सुवर्णा भोपे, माधुरी लोलसुरे यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta