
एकाग्रता, शिस्त, सातत्य : अंगमेहनत, धाडसाचा अनुभव
निपाणी (विनायक पाटील) : कोरोना महामारीपूर्वी मुंबई, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज, पुणे शहरापर्यंत मानाच्या अन् लाखोंच्या हंड्या फोडणारी नावाजलेली गोविंदा पथके पुन्हा एकदा सज्ज झाली होती. बुधवारी (ता.24) सायंकाळी निपाणी येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळतर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ’गो गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाचे कार्यकर्ते थरावर थर रचण्याची त्यांची चुरस निपाणी करांना पुन्हा एकदा अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाने फोडली त्यांना बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ही दहीहंडी पाण्यासाठी निपाणी शहर आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
सायंकाळी पाच वाजल्यापासूनच चाटेमार्केट परिसरात अबालवृद्ध नागरिक गर्दी करत होते. याशिवाय सतत होणार्या वादाच्या गजरात कार्यकर्ते मनसोक्त नाचत होते. अशातच गोविंदा पथकासह नागरिकांवर पाण्याचा मारा केला जात होता. शिटीच्या तालावर एकावर एक मानवी मनोरे रचले गेले. त्यात गोविंदांची खरी परीक्षा दिसून आला. शिस्तबद्धरितीने रचलेले मनोरे, एकाग्रता, शिस्त, सातत्य, अंगमेहनत अन् धाडस यांचा मिलाफ, चारही मुख्य बाजूंनी दिला जाणारा मानवी शिडीचा आधार, अलगद खांद्यावर चढणारे दोन किंवा तीन एक्के, शरीराचा सामूहिक भार सात ते आठ मिनिटे खांद्यावर घेण्याचा संयम आणि गोविंदांची चिकाटी पाहण्याची पर्वणी नागरिकांना लाभली. गोविंदांच्या देहबोलीतून पूर्वीचाच जोश आणि उत्साह जाणवत होते.
प्रारंभी नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी स्वागत केले. यावेळी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, नव्या पिढीने पारंपारिक साहसी खेळांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते योगदान देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पुढील वर्षी याच ठिकाणी एक लाख रुपयाची दहीहंडी फोडण्याची घोषणा केली.
यावेळी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, उपनिरीक्षिका कृष्णवेनी गुर्लहोसुर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीमंत विजय राजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, सरफराज उर्फ शेरू बडेघर, शौकत मनेर,दत्ता नाईक, संजय पावले, डॉ.जसराज गिरे, दिलीप पठाडे, अनिस मुल्ला, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, अन्वर बागवान आल्लाबक्ष बागवान, इम्रान मकानदार, शिरीष कमते, मंडळाचे अध्यक्ष अनिल फुटाणकर, उपाध्यक्ष पांडुरंग भोई, सेक्रेटरी अल्ताफ हाजूखान, खजिनदार ओंकार शिंदे, सदस्य अतुल शिंदे, साहिल बागवान, अभिषेक भुई, चेतन चव्हाण, खुदबुद्दीन हदाले यांच्यासह चाटे मार्केट व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta