वीट उत्पादकाला लाखो रुपयांचा फटका
कोगनोळी : वीट उत्पादकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी कोगनोळी (तालुका निपाणी) येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ उघडकीस आली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सुळकूड (तालुका कागल) येथील पांडूरंग जाधव यांची कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशेजारी इंग्लिश मेडियम स्कूलजवळ वीट निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये काम करणारा कर्मचारी पावसाळ्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या गावी गेला आहे. त्यामुळे याठिकाणी वीट उत्पादन केलेल्या विटा, ट्रॅक्टर, ट्रॉली व अन्य साहित्य गेटच्या आतमध्ये ठेवलेले असते. या ठिकाणी कोणीच नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मंगळवारी रात्री ट्रॅक्टर-ट्रॉलीची चोरी करुन नजिकच्या महाराष्ट्रामध्ये पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पांडूरंग जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदर वीट उत्पादक कारखान्यावर सीसीटीव्ही कार्यरत आहे. तसेच रस्त्यालगत असणाऱ्या काही हॉटेलमध्येसुद्धा सीसीटीव्ही असल्यामुळे त्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरटे नक्कीच जेरबंद होतील अशी अपेक्षा उपस्थितांमधून व्यक्त होत आहे. चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांच्यासमोर या चोरीचा छडा लावण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. पांडूरंग जाधव यांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या घटनेची कच्ची तक्रार दिल्याचेही सांगितले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरीचा छडा लावणार का? याकडे लोकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …