निपाणीत शनी अमावस्या सोहळा
निपाणी (वार्ता): महाप्रसादासाठी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित येत असून स्नेहभोजनातून जातीय सलोखा निर्माण होतो. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. त्यामुळे अन्नदान झाले पाहिजे व ते टिकले पाहिजे, असे उपक्रम विविध ठिकाणच्या देवस्थान व मंदिर कमिटीने राबवून सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी व्यक्त केले. परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदर्शनगर येथील शनैश्वर मंदिरात शनिवारी (ता.२७) अमावस्या उत्सव व महाप्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
मंदिराच्या विश्वस्त प्रमिला रुडगी यांनी स्वागत केले. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. अमावस्येनिमित्त सकाळी निरंजन बोरगावे यांच्या हस्ते पूजा, अभिषेक कार्यक्रम झाला. त्यानंतर आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी एक हजार भाविकांनी उपस्थिती दर्शवून श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी नगरसेविका कावेरी मिरजे, ॲड. सुषमा बेंद्रे, अमृता बोरगावे, मेघा सुतार, साधना चौगुले, प्रियांका पाटील, भाग्यश्री खोत, राजश्री चव्हाण, सागर मिरजे, राजू जाधव, गजानन चौगुले, दत्ता पाटील, प्रमोद सुतार, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पदाधिकारी व भक्तांनी परिश्रम घेतले. मंदिराचे सचिव एस. एस. चव्हाण यांनी आभार मानले.