रावसाहेब पाटील यांची माहिती: विविध कार्यक्रमाचे आयोजन
निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी महोत्सव हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) सोमवारी (ता. २९) होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, समारंभाचे अध्यक्ष, श्रावक रत्न रावसाहेब पाटील यांनी दिली.
रावसाहेब पाटील म्हणाले, विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट १०८ प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज यांचे पावन पवित्र्य, स्मृती चिंतन, अभिवादन करण्याबरोबरच त्यांना अभिप्रेत अशा चरित्र, चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग, तपस्या, संयम या सारख्या सदविचाराचे समाजात अभिसरण व्हावे. त्यांच्या आदेश उपदेशाचा प्रचार प्रसार व्हाव. त्यांच्या अलौकिक चिरंजीव आचार विचाराचे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती समाजात पोहचाव, यासाठी या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
महोत्सवासाठी १०८ आचार्यरत्न श्री बाहुबली महाराज यांचे परम प्रभावक शिष्य १०८ आचार्य जिनसेन महाराज, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी, संस्थान मठ नांदणी व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी, संस्थान मठ कोल्हापूर यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. या मंगलदिनी त्यांच्या सल्लेखना समयी सकाळी ६.५५ वाजता शांतिद्विप प्रज्वलन, विश्वशांति प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय होणार आहे.
पुण्यतिथीनिमित्त सकाळी १० वा. अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शांतिसद्भावना रॅलीचा शुभारंभ सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मंताडाराजा दयानिधी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सांगली पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम, तहसिलदार बी. जी. गोरे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, युवानेते रोहित आर. पाटील उपस्थित राहणार आहेत.
पुण्यतिथी महामहोत्सवाचा मुख्य समारंभ दुपारी १.३० वा. शालेय प्रांगणात होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणुन नितीन बानगुडे- पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे, खासदार संजयकाका पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंतराव पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विश्वजीत कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आम. सुमनताई आर. आर. पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अभय पाटील, आमदार श्रीमंत पाटील, ऍड. धनंजय गुंडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले.
बैठकीस वीर सेवा दलाचे बाळासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, अभय करोले, आर. बी. खोत, रावसाहेब कुन्नुरे, अभय भगाजे, आनंद उगारे उपस्थित होते.