कामगारावरही होणार परिणाम : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील (निपाणी) अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रातील अर्जुनी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील अर्जुननगर (ता. कागल) येथे ३५ वर्षापूर्वी जागा घेऊन विविध प्रकारचे कारखाने सुरू केले. तेव्हापासून कारखान्यातील कामगार व वाहनासाठी कर्नाटक हद्दीतील रस्ता रहदारीचा बनला होता. पण अचानकपणे या रस्त्यावर कुंपण घालण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांची ये-जा बंद होणार आहे. परिणामी उद्योजकासह कामगारांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहदारीचा रस्ता कायम ठेवावा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत आजी-माजी लोकप्रतिनिधींना माहिती देऊनही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तात्काळ याबाबत निर्णय घेऊन पूर्वीप्रमाणे वहिवाटीचा रस्ता खुला करावा, अशी मागणी येथील उद्योजक, माजी सभापती विश्वास पाटील, विनायक कमते, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर,मोहन शाह, बाबासाहेब तिप्पे, अशोक कमते, योगेश पीसोत्रे, यांच्यासह शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
सन १९८५ पासून या महाराष्ट्र राज्य मध्ये कर्नाटक सीमाभागातील निपाणीमधील अनेक उद्योजकांनी जागा घेऊन आपापले उद्योग व्यवसाय उभारले आहेत. आजतागायत उद्योजक, वाहनधारक, कामगार परिसरातील नागरिक, परिसरातील शेतकरी याच रस्त्यावरून ये -जा करत होते. या भागात तीन एकरमध्ये ४२ प्लॉट पाडण्यात आले होते. त्यामध्ये कांतीलाल मेहता यांच्या १८ प्लॉटचा समावेश आहे. परिसरात सुरू झालेल्या कारखान्यामध्ये सुमारे २०० कामगार कार्यरत आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी कर्नाटक हद्दीतील वहिवाटीचा रस्ता सुरू होता. याशिवाय गायकवाडी कोडणी परिसरातील शेतकरी, पशुपालक येथील ओड्यातील पाण्यासाठी ये-जा करीत आहेत.
मध्यंतरी कर्नाटक हद्दीतील जागा रस्ता लागत असल्याने त्याची मागणी वाढली. त्यामुळे अनेकांनी एकमेकांना प्लॉटची विक्री केली. पण आता अचानकपणे संबंधित प्लॉटधारक तीन गुंठे रस्त्यासाठी ३० लाखाची मागणी करीत आहेत. मात्र अलीकडच्या काळात उद्योग व्यवसायावर परिणाम झाल्याने संबंधित उद्योजकांना इतकी मोठी रक्कम देणे कठीण झाले आहे. शिवाय वीज, पाणी अशा सुविधाही नसल्याने उद्योजक अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार यांच्या परस्पर सहकाऱ्यांने हा रस्ता होणार आहे. त्यामुळे सर्वच उद्योजक व कामगारांचे हित जोपासले जाणार आहे.
अशा परिस्थितीत रस्ता बंद होत असल्याने उद्योजक, कामगार व परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हा वहिवाटीचा असलेला रस्ता कायम राहावा, यासाठी येथील उद्योजकांनी महसूल खाते, कागल तहसीलदार, निपाणी तहसीलदार, निपाणी नगरपालिकेतील आजी, माजी पदाधिकाऱ्याकडे मागणी केली आहे. पण निर्णय होण्या अगोदरच हा रस्ता बंद होत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता वहीवाटीप्रमाणे खुला करण्याची मागणी अर्जुननगर येथील कारखानदार, कामगार आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta