
महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळ: आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी : येथील महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळांचे यंदा ५१ वे वर्ष आहे. त्यानिमित्त बुधवारपासून (ता.३१) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी अडीच हजार नारळापासून सात दिवस मेहनत घेऊन ११ फुट गणेश मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती यावर्षीचे खास आकर्षण ठरली आहे. उत्सव भव्य प्रमाणात करण्यासाठी माजी सभापती सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली गणेश मंडळाचे आठवड्याभरापासून कार्यकर्ते कार्यरत झाले आहेत.
नेत्रदीपक विद्युत रोषणाई, शंभराहून अधिक वारकऱ्यांच्या टाळ -मृदंगाच्या गजरात गणेशाचे आगमन ही येथील महादेव गल्लीमधील गणेश मंडळाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये असणार आहे. गणेश मंडळाची आगमन मिरवणूक शहरवासीयांमध्ये औत्सुक्याची आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होणारी ही मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. यंदा गणेश मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे . त्यानिमित्त मुख्य रस्त्यावरून निघणारी गणेश आगमन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
शहरात ७० हून अधिक मंडळे कार्यरत आहेत. मात्र ५१ वर्षे पूर्ण करणारे हे एकमेव मंडळ आहे. या मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक ही जल्लोषी वातावरणात निघणार आहे. गणेश मंडळाच्या ५१ व्या वर्षानिमित्त नारळापासून ११ फुटी आकर्षक गणेश मूर्ती कोल्हापूर येथील मूर्तिकार सुखदेव कुंभार यांनी बनवली आहे. गणेशाच्या आगमनावेळी पंढरपूर येथील जोगदंड महाराज वारकरी टाळ – मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. मंगळवारी (ता.६) सायंकाळी हळदी कुंकू समारंभ व महाआरती होणार आहे. बुधवारी (ता. ७) श्री गणेश याग यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १० दिवस रोज रात्री मान्यवरांच्या हस्ते महा आरती होणार आहे. अनंत चतुर्दशीदिवशी गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक इचलकरंजी येथील ढोलताशा व डीजे लाईट इफेक्टच्या गजरात काढली जाणार आहे. यावेळी पारंपरिक वाद्यतसेच हत्ती, घोडे हे मिरवणुकीचे आकर्षण आहे. त्यामुळे या मंडळाच्या मिरवणुकीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta