Share
निपाणी (वार्ता) : ऊस संशोधन व विकासात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा युथ आयकॉन हा मानाचा पुरस्कार बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांना त्यांच्या सहकार, अर्थ, कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून जाहीर करण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी पुणे येथील ग्रँड हयात रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलमध्ये यापुरस्काराचे राष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. युवा नेते उत्तम पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात केलेले भरीव कार्य, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्याबरोबरच अनेक युवकांना रोजगार देवून त्यांना आर्थिक पत मिळवून दिली आहे. याबरोबरच अरिहंत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम, धार्मिक तसेच सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा भरवून सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे. याची दखल घेऊन भारतीय शुगर या संस्थेने उत्तम पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली. या संदर्भातील पत्र सदर संस्थेने नुकतेच पाटील यांना पाठवले आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, अमित कोरे आदी मान्यवरांचा समावेश असलेल्या या संस्थेने उत्तम पाटील यांना युथ आयकॉन या पुरस्कारासाठी ७ सप्टेंबर रोजी निमंत्रित केले आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post Views:
557
Belgaum Varta Belgaum Varta