कुर्ली हायस्कूलमध्ये तंत्रज्ञानचा अविष्कार
निपाणी (वार्ता) : निती आयोगाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक उत्तरे शोधण्यासाठी, आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे, हे अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांची तंत्र कौशल्ये विकसित करण्यासाठी निश्चितपणे अटल टिंकरिंग लॅबचा उपयोग होईल, असे मत शारदा गौराई मॅटर्निटी व नर्सिंग होम निपाणीचे डॉ. संतोष चव्हाण यांनी कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. यशवंतराव थोरात होते.
अॅड. संजय शिंत्रे यांनी स्वागत केले. डॉ. संतोष चव्हाण यांच्या हस्ते अटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. लॅब प्रमुख एस. एस. चौगुले यांनी अटल लॅब स्थापनेची माहिती दिली. यावेळी लाइन फॉलोअर रोबोच्या माध्यमातून मान्यवरांना सलामी देण्यात आली. कोल्हापूर येथील आरएनटी रोबो किट्स लॅब ट्रेनर श्रध्दा लोहार-आणूर यांचा डॉ. थोरात यांच्या हस्ते सत्कार झाला. विद्यार्थ्यांनी स्मार्ट पार्किंग, डस्ट सेप्रेटर, आधुनिक डिजिटल शेती तंत्रज्ञान, सेफ ट्रॅव्हल रेल्वे, ब्लाइंड स्टिक, लाईट ऑपरेटिंग सिस्टीम अशा 42 उपकरांचे प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित मान्यवरांनी तंत्रज्ञान वापराचे कौशल्य पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी नीती आयोगामार्फत लॅबसाठी पुरविलेल्या आधुनिक साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले. कुर्ली पंचक्रोशी परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली.
Belgaum Varta Belgaum Varta