भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रतिपादन
कोगनोळी : शासनाच्या, सरकारच्या भरोशावर बसू नका, गावासाठी गावकर्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र आल्यास आपल्या गावचा खर्या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.
हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना बोलत होते.
पेरे-पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे, गल्लोगल्ली, गावात फळ झाडांची लागण करणे, सेंद्रिय शेतीसोबत जोडधंदा करण्यास प्राधान्य देणे ह्या गोष्टी अग्रक्रमाने झाल्याच पाहिजेत. आम्ही हे सर्व आधी केले आणि मग सांगितले आहे. गावातील वृद्धांची जबाबदारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची आहे. पहाटे 4 ते 6 या वेळेत ग्रामस्थांना आंघोळीस गरम पाणी उपलब्ध करुन देणारी एकमेव आपली ग्रामपंचायत आहे. येथे सर्व सुविधा मोफत पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. वर्षभरात होणारे ध्वजारोहणाचे कार्यक्रम सर्वात अधिक महसूल देणार्या कुटुंबियांच्या गृहिणीकडूनच करविण्यात येतो. गावच्या विकासासाठी गावातील ग्रामस्थ आपल्यामधील मतभेद आणि हेवेदावे विसरुन जर एकत्र आले तर गावचा विकास होणे 100 टक्के शक्य आहे, असेही शेवटी भास्करराव पेरे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी कागल व निपाणी तालुक्यातील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta