मंडळ पोलीस निरीक्षक शिवयोगी : शहर ग्रामीण भागात पोलिसातर्फे जनजागृती
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात लहान मुले चोरणारी टोळी आणि नागरिक सक्रिय झाल्याची अफवा गेल्या काही दिवसापासून सुरू झाली आहे. त्याबाबत समाज माध्यमावरही अनेक अफवा पसरल्या जात आहेत. अशी कोणतीही टोळी अथवा नागरिक नसून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शिवाय अशा व्यक्ती आढळल्यास त्यांना मारहाण केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा निपाणी येथील मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी दिला आहे. या अफवाबाबत येथील बस स्थानक व शाळा परिसरात त्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली त्यावेळी ते बोलत होते.
मंडळ पोलीस निरीक्षक शिवयोगी म्हणाले,कर्नाटक राज्यात बालक (लहान मुले) चोरी करणारी टोळी आल्याची अफवा आहे. ही संपूर्ण खोटी बातमी आहे. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शिवाय जनतेने घाबरून जाऊ नये. इतर राज्य आणि जिल्ह्यातील साहित्य विक्री विक्रीसाठी काही व्यवसायिक निपाणी भागात येत आहेत. पण त्यांना लहान मुले चोरी करत असल्याचे समजून मारहाण केली जात आहे. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. साहित्य अथवा वस्तू विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांवर हल्ला करू नये. कोणत्याही कारणासाठी त्यांच्या गावी या संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता ११२ पोलिस हेल्पलाइनवर कॉल करावे. आलेल्या पोलिसांना योग्य ती माहिती द्यावी. तशी काही घटना घडल्यास ताबडतोब आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोल रूमला (पोलीस कंट्रोल रूम बेळगाव) आणि त्यांच्या बीट पोलीस कर्मचाऱ्यांना कळविणे आवश्यक आहे. संशयास्पद व्यक्तींना मारहाण करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतच्या खोट्या बातम्या व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअर करू किंवा फॉरवर्ड करू नये. याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपल्या लहान मुलांची काळजी घेत अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही संगमेश्वर योगी यांनी केली आहे.
बुधवारी (ता.१४) येथील बस स्थानक, सरकारी व खाजगी शाळा, बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्यासह शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसुर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, हवालदार पी. के. कांबळे व सहकाऱ्यांनी शहरासह ग्रामीण भागातील यमगरणी, नांगनूर, खडकलाट परिसरात जनजागृती केली.
Belgaum Varta Belgaum Varta