ग्रामीण पोलिसमार्फत कुर्ली हायस्कूलमध्ये जनजागृती
निपाणी (वार्ता) : मुले पळविणारी टोळी आली आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. कोणतीही संशयास्पद घटना परिसरात घडत असल्याचे वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. त्यावर पोलिस कारवाई करतील. कुणीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वासही ठेऊ नये, असे आवाहन निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवालदार संजयकुमार एस. एच. यांनी केले. ते सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे पोलीस मित्र जनजागृती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील हे होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. संजयकुमार म्हणाले, आपल्या गावात, शेतवस्तीवर, वाड्यांवर येणारे अपरिचित, संशयित वाटणारे, मनोरुग्ण, भटके-फिरस्ते लोक, साधूवेशातील संशयित तसेच किरकोळ विक्री करणारे संशयित फेरीवाले यांना परस्पर मारहाण करू नका. कुणाबद्दल संशय वाटल्यास अशावेळी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून ते खरेच चोर आहेत का, की वाटसरू आहेत, याचा उलगडा होईल. पोलिस निश्चितपणे अशा गोष्टींची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करतील. परंतु अशा बेदम मारहाणीत एखादी व्यक्ती मयत झाल्यास संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल होतो. तसेच सोशल मीडियावर चोरीच्या अफवा जास्त प्रमाणात पसरतात तेव्हा प्रकार खरा की खोटा याची खात्री करून मगच असे संदेश पुढे पाठवा, असे आवाहन केले आहे. पोलिस नागरिकांच्या सोबत सदैव आहेत. एखादा संशयित किंवा चोर याबद्दल माहिती मिळाली तर निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशनला तात्काळ द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी एस. ए. पाटील, एस. एस. साळवी, एस. जी. लिंबीगिडद, यु. पी. पाटील, डी. डी. हाळवणकर, आर. आर. मोहिते, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta