कोल्ड स्टोरेज येथे चोरीचा प्रयत्न फसला : नागरिक भीतीच्या छायेखाली
निपाणी (वार्ता) : बोरगाव- इचलकरंजी रस्त्यालगत असलेल्या रोहिले कोल्ड स्टोरेज या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांनी पलायन केले. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी चोरीचा प्रयत्न होणारी महिन्यातील ही तिसरी घटना असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलीसाकडून गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, बोरगाव – इचलकरंजी रस्त्यालगत रोहिले यांच्या मालकीचे कोल्ड स्टोरेज आहे. हे कोल्ड स्टोरेज गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. या कोल्ड स्टोरेज मध्ये लाखो रुपयांचे मशनरी, डी फ्रीज, पंपसेट मोटर्स यासह लाखो रुपये किमतींचे साहित्य आहे. या ठिकाणी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरांनी बुधवारी (ता.१४) सुमारे साडेआठच्या सुमारास स्टोरेजच्या मागील बाजूने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या ठिकाणी असलेले लाखो रुपयांचे पंपसेट मोटर्स खोलण्याचा प्रयत्न केला. खोललेले सुमारे सात ते आठ मोटर्स वाहनात भरले जात होते. याचवेळी त्या दिशेने येणारे हिम्मत अफराज यांना या घटनेची तात्काळ माहिती मिळाली. त्यांनी तातडीने आजूबाजूच्या नागरिकांना बोलण्याचा प्रयत्न करीत असता चोरांनी पलायन केले. मोठ्या चोरीच्या प्रयत्न असताना चोरांना हा प्रयत्न फसला.
या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांनी सदलगा पोलिसांना ही माहिती दिली. यावेळी पोलीस अधिकारी घटनास्थळी येऊन प्रकरणाची माहिती घेतली. तसेच जवळच असलेल्या हॉटेल व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास गतिमान केला असून लवकरच याबाबत घटनेचा उलगडा होणार आहे. तीन महिन्यातून तिसरी अशी घटना असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याबाबत सतर्कता बाळगून रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. शिवाय नगरपंचायत अधिकारी पोलीस व गावातील युवकांना एकत्रित करून रात्रीच्या वेळी गस्त घालण्याबाबत नगरपंचायत कार्यालयात बैठक बोलवावी, अशी मागणीही युवा वर्गातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta