डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत २० रोजी सभेचे आयोजन
निपाणी (वार्ता) : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली तसेच पंजाबमध्ये एकहाती सरकारच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुरू आहे. देश भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी आम आदमी पार्टीची गरज आहे. त्यासाठीच देशात या पक्षाचा विस्तार होत आहे. निपाणी भागातही भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी तसेच प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी आम आदमी पार्टीचे काम सुरू करणार आहोत, अशी माहिती डॉ. राजेश बनवण्णा यांनी दिली.
निपाणीत आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. बनवण्णा पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे सामाजिक कार्यात आहोत. मात्र प्रशासनाकडून म्हणावे तसेच सहकार्य मिळत नाही. निपाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे निर्माण करावीत तसेच वाहतुकीला कायमस्वरूपी शिस्त लावावी यासह महत्त्वाच्या समस्या सोडवाव्यात म्हणून नगरपालिकेसमोर उपोषण केले. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळेच आम आदमी पार्टीच्या माध्यमातून भ्रष्टाचारमुक्त निपाणी हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत.
आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष भास्करराव, राजीव टोपन्नावर, संपतकुमार रेड्डी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.२०) येथील चिकोडी रोडवरील ब्रह्मनाथ संस्थेच्या भवनात आम आदमी पार्टीची सभा होणार आहे. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी प्रा.कांचन बिरनाळे, वासिम पठाण, आदर्श गिजवणेकर, पुंडलिक कांबळे, सागर कांबळे, हसन मुल्ला, डॉ.रवींद्र देवर्षी, अक्षय कार्वेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta