निपाणीत शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : देशातील सर्वच पक्ष भ्रष्टाचारी बनले आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे हा पक्ष दिल्लीत राज्य करत आहे. आता सर्वच नागरिकांना अनेक सोयी सुविधा पक्षातर्फे दिल्या जात आहेत. सरकारने कराचा सदुपयोग करून मोफत शिक्षण, आरोग्य वीज बिल अशा अनेक बाबींना फाटा देत सर्वांना दिलासा दिला आहे. देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी निपाणीतही आम आदमी पक्षाने प्रवेश केला आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवून काम करण्याचे आवाहन बंगळूरु येथील राज्याध्यक्ष भास्करराव यांनी केले. निपाणी येथे आयोजित आम आदमी पक्षाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निपाणी विभागीय अध्यक्ष डाॅ. राजेश बनवन्ना होते.
प्रारंभी कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मार्गावर दुचाकी फेरी काढली. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह शहरातील पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फेरीचे सभेत रुपांतर झाले. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
भास्करराव म्हणाले, भविष्यात ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा पंचायतीत आम आदमीचे कार्य होणार आहे. त्यासाठी निरपेक्षवृत्तीने सर्वांनी पुढे यावे तरच भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण होणार आहे. यापुढील काळात पदाधिकाऱ्यांचे संघटन करून निपाणी मतदारसंघातून डाॅ. राजेश बनवन्ना यांना विधानसभेत पाठवून कर्नाटकातही परिवर्तन करावे.
डाॅ. राजेश बनवन्ना म्हणाले, समाजातील भ्रष्टाचार मुक्तीसाठी अनेक वर्षापासून लढा देत आहे. आता भ्रष्टाचारमुक्त कर्नाटक करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे बदल घडविण्यासाठी सर्वांच्या एकीची गरज आहे. आजी, माजी मंत्री व लोकप्रतिनिधी खिडकीतूनच प्रवास करत आहेत. त्यामुळे आता बदल घडला पाहिजे. श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत असून गरीब हा गरीबच राहत आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना बलाढ्य लोकांची कर्जमाफी होत आहे. त्यामुळे शासनाकडून सर्वसामान्यांसाठी काम होत नाही. भ्रष्टाचार संपविण्यासाठी सर्वांनी या पक्षात सहभागी व्हावे.
प्रा. डाॅ. अच्युत माने म्हणाले, सध्या भांडवलदारी आणि प्रस्तापित जातीयवाद्यांचे राज्य आहे. त्याला परिवर्तन होण्यासाठी आम आदमी पक्ष उदयास आला आहे. हुतात्मा शेतकरयांच्या स्मारकाकडेही आजी, माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. भ्रष्टाचारी आणि खोट्यांचा सन्मान सुरु असून या चळवळीला आपला पाठींबा आहे. विनायक देसाई यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संपतकुमार शेट्टी, राजकुमार टोप्पण्णावर, विजय भास्करमठ, वासिम पठाण, आदर्श गिझवणेकर, हसन मुल्ला, प्रकाश माने, डाॅ. संदेश पाटील, डाॅ. जगदीश, राजू हिंग्लजे, डाॅ. रवींद्र देवर्षि, संजय खोडबोळे, चेतन सूर्यवंशी, उदय शिंदे, पी. जे. खाडे, सदाशिव पोवार, प्रवीण माळी, ऋषी चव्हाण, प्रकाश पोळ, दयानंद पाटील, नवाज कडगी, अजित पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कांचन बिरनाळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta