कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (तालुका निपाणी) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हालसिद्धनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजरी होणारी पाच दिवशीय यात्रा मंगळवार तारीख 11 ऑक्टोंबरपासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेनिमित्त तारीख 11 ते 15 ऑक्टोंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार तारीख 11 रोजी सकाळी श्रींची पालखी सबिना व रात्री ढोल जागर, बुधवार तारीख 12 रोजी रात्री ढोल जागर व श्रींची पालखी सबिना, गुरुवार तारीख 13 रोजी श्रींची पालखी सबिना व रात्री पहिली भाकणूक, शुक्रवार तारीख 14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी महानैवेद्य, रात्री श्रींची पालखी सबिना व रात्री दुसरी भाकणूक होणार आहे. शनिवार तारीख 15 रोजी सकाळी 7 वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक, दुपारी 4 वाजता श्रींची पालखी सबिना व यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेमध्ये येणाऱ्या व्यापारांसाठी विविध दुकाने थाटण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तारीख 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत व्यापाऱ्यांनी आपली जागा निश्चित करावी. यात्रा काळात सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. तसेच यात्रा काळात पाच दिवस शाळा आवारात हालसिद्धनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भाविकांसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी, रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त पूर्वतयारी सुरु असल्याची माहिती बाबुराव अर्जुन खोत अध्यक्ष यात्रा कमिटी व सदस्य, मानकरी, पुजारी, ग्रामस्थ यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta