सद्गुरू हॉस्पिटलमध्ये जागतिक हृदय दिन
निपाणी (वार्ता) : बदलती जीवनशैली ताण-तणाव यामुळे अनेक समस्या मानवी जीवनामध्ये उद्भवत आहेत. जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार व हृदयविकारामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण योग्यवेळी योग्य खबरदारी घेतल्यास माणसाला आपण जीवदान देऊ शकतो, असे प्रतिपादन येथील लाफायेट हॉस्पिटलच्या डॉ. मीना ससे यांनी केले. गुरुवारी (ता२९) जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा झाला. त्यानिमित्ताने हनुमान नगरातील श्री सद्गुरु हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी येथील नामवंत भूलतज्ञ डॉ. उषा शहा उपस्थित होत्या.
सद्गुरु हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. उत्तम पाटील व डॉ. प्रतिभा पाटील तसेच सर्व कर्मचारी वर्ग व पेशंटच्या समोर हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे, याचे मार्गदर्शन त्यांनी करून दाखविले. कर्मचारी तसेच रुग्णाकडून ही प्रात्यक्षिके करून घेऊन माहिती दिली. या माहितीमुळे आपण एक मिनिटाच्या आत उपचार केल्यास एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमोपचार करावे. तसेच १०८ क्रमांकाला फोन करून लगेच रुग्णाला ऍडमिट करावे.
असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, नशा, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवा, पाणी प्रदूषण, बेसुमार किटकनाशकाचा वापर यामुळे दिवसेंदिवस हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. तरी प्रत्येकाने दक्षता घेऊन आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उपस्थित नागरिक आणि रुग्णांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी मुद्देसूद उत्तरे दिली. उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta