शिवापुरवाडी येथील कार्यक्रम: शाळा खोलीची पायाभरणी सह वेतन व गॅस वाटप कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मजुराई, हाज व वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने शिवापुरवाडी येथे कन्नड प्राथमिक शाळा खोलीच्या बांधकामासाठी 12 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर विधवा पेन्शन, कोविड काळात मयत झालेल्यांच्या वारसांना 50 हजाराची आर्थिक सहाय्य व 13 सर्वसामान्य कुटुंबीयांना स्वयंपाक गॅस किट मंजूर केल्या. या सर्वाचे वितरण व शाळा खोलीची पायाखुदाई समारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या मुलींनी लेझीम वाद्याद्वारे त्यांचे स्वागत केले. मात्र यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांना लेझीम खेळाचा मोह न आवरल्याने स्वतः हातात लेझीम घेऊन त्यांनी ग्रामीण भागातील हा खेळ खेळला. त्यामुळे त्यांच्यातील ग्रामीण भागात असलेल्या खेळांची जपणुकीची उमेद दिसून आली.
प्रारंभी कुन्नूर ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या शिवापुरवाडी गावात मंत्री शशिकला जोल्ले यांचे आगमन झाल्यानंतर लेझीम वाद्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेतले.
सरस्वती मातेच्या फोटोंचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून पायाखुदाई करण्यात आला. मुख्याध्यापिका एस. एम. कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विविध वेतन पत्र वितरण, कोविड अर्थसहाय्य व गॅसचे वितरण करण्यात आले.
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, अलीकडच्या काळात चांगले संस्कार व चांगले शिक्षण प्रत्येकाला देणे गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रथम शाळा खोल्या चांगल्या हव्यात. म्हणूनच शिवापुरवाडी येथील शाळेला एक खोली मंजूर केली आहे.त्याचा पाया खुदाई झाला. महिलांना सोयीचे व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उज्वल गॅस योजनेतून गॅस देण्याची व्यवस्था केली आहे. कोविड काळात मयत झालेल्यांच्या वारसांना 50 हजार प्रमाणे अर्थसहाय्य व विधवा पेन्शन मंजूर केले आहे. असे सांगून महिलानी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग सुरू करायला हवा. तेव्हा आता महिलांनी विविध व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहाय्य करू असे सांगितले.
यावेळी ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा सरोज जमदाडे, ग्राम पंचायत अध्यक्षा राणी कोळी, गीता बुरुड, श्रीधर खोत, सातगोंडा खोत, किरण कोपार्डे, चेतन चेंडके, श्रीकांत कणंगले, लक्ष्मण कांबळे, विजय पाटील, धनाजी हुजरे, कुतबुद्दीन जमादार, रमेश खोत, लक्ष्मण खोत, सत्पाल माळगे, भरत खोत, राजू भदरगडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते, एसडीएमसी कमिटी सदस्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी व महिला वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta