राजू पोवार : जिल्हा पंचायत बैठकीत निर्णय
निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची शंभर किलो मिळणारी साखर रद्द करून केवळ ५० किलो साखर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. त्या संदर्भात वार्षिक सभेत प्रश्न विचारूनही अध्यक्षांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समांतर सभा घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती दिली गेली. पण त्याबाबत कोणती हालचाल न झाल्याने जिल्हा पंचायत कार्यालयात साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि रयत संघटनेच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संघटनेच्या मागण्या मान्य होण्यासह साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला तोड देऊ नये, असे आवाहन रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केले. बेळगाव येथे जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, साखर कारखान्याची सभासदांची सभा की भाजपची सभा असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला होता. कारखान्याच्या आदेशांना अनेक प्रश्न विचारले असता एकाही प्रश्नाला त्यांनी समर्थक उत्तर दिलेले त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी साखर आयुक्त, साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकासह शेतकऱ्यांची बैठक बोलवली होती. यापूर्वीही आपण जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठिकाणी मोर्चे आंदोलने केले आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाच्या हंगामातील उसाचा दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत असा आदेश काढला आहे. तरीही दर जाहीर न करता कारखाने सुरू केल्यास रयत संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. एफआरपी नुसार सर्वच साखर कारखान्यांनी दर देणे बंधनकारक असले तरीही एफआरपीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणक केली जात आहे. यंदाच्या हंगामात प्रति टन 5000 रुपयांवर दर मिळणे आवश्यक आहे पण ऊस तोडणी व वाहतुकीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. हा अन्याय रयत संघटना कधीही खपवून घेणार नाही. यंदा उसाचे क्षेत्र मोठे असून साखर कारखाने ही जास्त आहेत. त्यामुळे ऊस तोडणी साठी गडबड करू नये. सर्व शेतकऱ्यांनी याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचने नुसार दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड देऊ नये असे आवाहन राजू पोवार यांनी शेवटी केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक सूचना केल्या. बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, शिवानंद केकेरी, जिल्हा पंचायत अध्यक्षासह रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक, शिवानंद मोगलिहाळ, गणेश ऐगळी, रवी सिद्धपनावर , मल्लिकार्जुन रामदुर्ग, सुभाष शिरगुर, रमेश पाटील, भगवान गायकवाड, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, हालाप्पा ढवणे, बाळासाहेब पाटील, राजाराम पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta