सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात. यावेळी सर्वच शेतकर्यांना चांगला दर देण्याची घोषणा केली जाते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्यांच्या तोंडाला पाणी पुसून तुटपूंजा दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी एफआरपी शिवाय जादा 500 रुपये दर मिळालाच पाहिजे. याशिवाय अतिवृष्टी महापूर काळात झालेले पीक आणि घरांची नुकसान भरपाई तरी द्यावी, अशी मागणी असा इशारा रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केली आहे. त्यासाठी सोमवारी (ता.10) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये परिसरातील संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे. येथील शासकीय विश्रामधामात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी व बिगर ऊस उत्पादक शेतकरी हे कारखान्याचे भाग भांडवल धारक आहेत. त्यांना प्रत्येक वर्षी 100 किलो साखर देणे बंधनकारक आहे. तरीही शेतकर्यांना आत्यल्प साखर देऊन बोळवण केली जात आहे. याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांना निवेदन दिले आहेत. पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही प्रकारची निवेदन न देता थेट रस्त्यावर उतरून आसूड मोर्चा आणि ऊसाचा दांडका घेऊन आंदोलन केले जाणार आहे.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतकर्यांसह इतर भागातील शेतकर्यांच्या सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण आजतागायत त्याचा सर्वे झालेला नाही. त्यामुळे तात्काळ निपक्षपतीपणे सर्वे करून प्रत्येक शेतकर्याला एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. ढोणेवाडी येथील अनुष्का भेंडे प्रकरणातील कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. याबाबतचिकोडी येथील शैक्षणिक जिल्हा उपसंचालकाकडे चौकशी केली असता त्यांनी दूरध्वनी उचलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या पुढील काळात रस्त्यावर उतरून भेंडे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सोमवारी होणार्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी निपाणी भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन पोवार यांनी केले आहे.
यावेळी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष रमेश पाटील, उमेश भारमल, सर्जेराव हेगडे प्रा. हालाप्पा ढवणे, बाळू पाटील, नामदेव साळुंखे, बापूसाहेब पाटील, सर्जेराव हेगडे, राजू यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta