मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांचे आवाहन
कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा तारीख ११ ते १५ ऑक्टोंबर अखेर होणार आहे. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा आरकता माजू नये व यात्रा शांततेत पार पाडावी, असे आवाहन निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले.
आप्पाचीवाडी (तालुका निपाणी) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये हालसिद्धनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार हे होते.
शिवयोगी पुढे म्हणाले, यात्रेमध्ये ट्राफिक व्यवस्थेसाठी आमच्या पोलीस ठाण्यामार्फत योग्य ती काळजी घेऊ. ज्या ठिकाणी ट्राफिकची व्यवस्था आहे अशा ठिकाणी वाहने पार्किंग करुन येणाऱ्या यात्रेकरुंनी सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विश्वास आबणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यात्रेमध्ये चार ते पाच ठिकाणी पार्किंग व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रेमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्हाईट फोर्स कमांडोची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हाकवेकडून येणाऱ्या वाहनधारकांना आप्पाचीवाडी सरकारी हायस्कूलच्या पटांगणामध्ये वाहने पार्किंग व्यवस्था, कुर्लीकडून येणाऱ्या वाहनांना पश्चिमेकडील म्हसोबा मंदीराजवळ, कुर्ली पूर्व बाजूकडून येणाऱ्या वाहनांना कुरणे माळ तर मल्लयाकडून येणाऱ्या वाहनांना अंधार लक्ष्मी समोरील दिवटे माळ येथे वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
या बैठकीस यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबुराव अर्जुन खोत, ग्रामपंचायत उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, राजाराम खोत, बापूसो पुजारी, सोहन खोत, धनाजी पोटले, विनोद माने, संजय कोकणे, शाहू जाधव, विशाल गवंडी, सुकुमार वंजोळे, बाजीराव पुजारी, सर्जेराव हेलाटे, बाजीराव कोकणे, बाबू माने, हाल्लाप्पा बोते, महेश माने यांच्यासह अन्य मान्यवर, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, मानकरी, पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सचिव संजय खोत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta