
निपाणी पोलिसांची कारवाई : आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातून दुचाकीवरून कर्नाटकात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका युवकाला मोठ्या शिताफीने निपाणी पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना मंगळवारी (ता.११) घडली. अमीर बशीर जमादार (वय २१ राहणार तेरवाड ता. शिरोळ) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे सहा हजार रुपये किमतीचा ४९० ग्राम गांजा, आठ हजार रुपये चा मोबाईल आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. संबंधित आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याची पोलिसांनी हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आरोपी अमीर जमादार हा शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथून कर्नाटकातील निपाणी परिसरात गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी बसवेश्वर चौक पोलिसांचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, हवालदार शेखर असोदे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून संशयित आरोपी अमीर जमादार याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने गांजा विक्रीसाठी तेरवाडहून आपण गांजा विक्रीसाठी निपाणीत आल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर अमली पदार्थ विक्री विरोधी गुन्हा दाखल करून ही कारवाई केली. सायंकाळी उशिरा त्याला हिंडलगा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. या कारवाईत बी. बी. कांबळे, एस. एल. गळतगी, एम. ए. तेरदाळ, व्ही. एस. बाळीकाई, आर. एम. पाटील, आर. आर. मदगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta