निपाणी (वार्ता) : सतत पडणारा पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडून दररोज अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होण्यासह वाहनांचेही नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा मार्गावरील शिप्पूर- उत्तुर रस्त्याची चाळण झाले असून खड्ड्यांची मालिका निर्माण झाली आहे. अखेर आम आदमीच्या निपाणी शाखेतर्फे अध्यक्ष डॉ. राजेश बनवन्ना व कार्यकर्त्यांनी त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग जवळून गडहिंग्लज उत्तुर आणि गोव्याला जाण्यासाठी दुचाकी चार चाकी वाहनांची नेहमीच वर्दळ आहे. हा रस्ता बऱ्याच वर्षांपूर्वी केला असून अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. वारंवार वाहनधारकासह नागरिकांनी मागणी करूनही खड्डे बुजून याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका निर्माण झाली आहे. सतत पाऊस पडत असल्याने खड्ड्यांच्या आकारात वाढ होऊन वाहनांचे टायर फुटणे पंक्चर होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. रात्रीच्या वेळी अशा घटना घडल्यानंतर दुचाकी व चार चाकी वाहनांना तिथेच रात्र काढावी लागत आहे. या घटनेचे गांभीर लक्षात घेऊन डॉ. बनवन्ना व कार्यकर्त्यांनी वरील मार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला आहे. त्याशिवाय हुक्केरी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत कल्पना देऊन तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. आठवडाभरात त्याची अंमलबजावणी न झाल्यास आम आदमी पक्षातर्फे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta