Wednesday , March 4 2026
Breaking News

ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्या

Spread the love

राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : परतीच्या पावसाने चिकोडी तालुक्यांमध्ये थैमान घातलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीसह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले तर तंबाखू ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड नैराष्यात आहे. समोर दिवाळी सारखा सण असतांना शेतकरी आसमानी संकटात सापडला असल्यामुळे दिवाळी अंधारात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने चिकोडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करण्यासाठी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केली. येथे आयोजित रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, पावसाच्या लहरीपणामुळे आधीच कमकुवत बनलेल्या सोयाबीन पिकाला परतीच्या पावसाने कुठे अतिवृष्टी सदृश्य तर कुठे मुसळधारेने झोडपून काढले. त्यामुळे काढणीस आलेल्या व शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन पावसाने भिजल्याने तर गंजी लावलेल्या सोयाबीनमध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या होतातोंडाशी आलेले नुकसान झाले. पुन्हा पावसाने सुरवात केल्याने शेतमजूर शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. त्यामुळे सतत पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.
तालुक्यामध्ये गेल्या चार वर्षापासून अतिवृष्टी सदृश्य तर कुठे ढगफुटी पावसाने कहर करून शेतकऱ्यांना वेठीस धरून मोठे नुकसान केले. यावर्षी चांगले भरघोस उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची पेरणी केली. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी तंबाखू आणि ऊस पीक घेतले होते. पण पावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.या ओल्या दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार मात्र दुर्लक्ष करतांना दिसत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव असल्याचे कुठेच दिसून येत नाही. यामुळेच सरकारचे लक्ष्य शेतकऱ्यांच्या मागण्याकडे वळविण्यासाठी रयत संघटनेतर्फे वेळोवेळी बैठका घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. सध्या निपाणी तालुक्यात ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता ९० हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अनुदान जाहीर करावे. कोणत्याही अटीविना पिकवीमा मंजूर करावे, अशीही मागणी राजू पोवार यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *