स्वच्छतेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष-नगरसेवक शरद जंगटे यांचा आरोप
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील प्रमुख मार्गासह इतरत्र ठिकाणी घाणीचे साम्राज प्रस्थापित झाले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असतानाही नगर पंचायतीने शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरात डेंगू, मलेरिया सारख्या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव अगदी झपाट्याने वाढत आहे. याची त्वरित दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे असा आरोप नगर सेवक शरद जंगटे यांनी करून शहरचा संपूर्ण परिसर स्वच्छ व दुर्गंध मुक्त करावा अशा आशयाची लेखी तक्रार नगर पंचायत प्रशासनाकडे केली आहे.
तक्रारीत नगरपंचायत प्रशासनाने गावातील मूलभूत समस्येपैकी स्वच्छतेकडे अधिक प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावात ठिकठिकाणी गटारीचे सांडपाणी साचून रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय बहुतांश ठिकाणी घणीची दलदल साचून राहिल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डास, जंतू यांचे प्रमाण वाढून शहरात रोगराईचे दूषित वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे स्वस्थ प्रशासनाने याकडे विशेष लक्ष केंद्रित करून रोगराई नियंत्रनावर आणण्यास स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. शिवाय या मूलभूत समस्येकडे लक्ष केंद्रित करून यासाठी सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारच्या औषधांच्या फवारण्या करून गल्ली बोळात सर्वत्र ठिकाणी गटारीवर जंतू नाशक पावडर शिंपडण्याचेहि निवेदनात नगरसेवक शरद जंगटे यांनी म्हंटले आहे.
गावात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. परिणामी शहरातील काही नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे भागासह शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या भटक्या मोकाट कुत्र्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने याचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे हि नागरिकांतून बोलले जात आहे.
त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने याची तातडीने चौकशी करून योग्य ती उपाय योजना करावी अन्यता कायदेशीर कारवाई करू, असा इशारा शेवटी वार्ड एकचे नगरसेवक जंगटे यांनी दिला आहे.