चिवडा, चकली, लाडूसह अनारसे बनविण्याची लगबग : दोन दिवसापासून खरेदीसाठी वाढली गर्दी
निपाणी (वार्ता) : प्रकाशाचा सण दिवाळी एक दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर आणि ग्रामीण भागात घरोघरी गोडधोड पदार्थ करण्यासाठी महिलांची मोठी लगबग दिसून येत आहे. नोकरदार महिला मात्र रेडिमेड फराळ तसेच विविध तयार पदार्थांना पसंती देत असल्याचे शहरात दिसून येत आहे.
दिवाळी सणाची लगबग घरोघरी पाहायला मिळत आहे. मात्र महागाईमुळे सर्वच फराळ कडवट झाला आहे.
महिला सध्या विविध पदार्थ तयार करण्यात व्यस्त दिसून येत आहे. दिवाळीसाठी गोडधोड पदार्थांसह फरसाणला पसंती दिली जात आहे. घरोघरी महिला चिवडा, रवा बेसणसह विविध लाडू, अनारसे, चकली, शेव तयार करण्यात महिला व्यस्त दिसून येत आहे. घरोघरी विविध पदार्थांचा घमघमाट सुटत आहे. शेव प्रकारात पालक, लसूण, रतलामी, भावनगरी, साधी बारीक असे विविध प्रकार तयार केले जात आहेत. दिवाळी सणाला गोड पदार्थाबरोबर खमंग चिवड्याला अधिक पसंती दिली जाते. चिवडा प्रकारात पातळ पोहे, मका, मुरमुरे चिवडा, मका मिक्स्चर चिवडा, नवरंग चिवडा असे प्रकार तयार केले जात आहे. दिवाळी सणाला लाडू प्रकाराला अधिक महत्व मानले जाते. लाडू प्रकारात रवा, बेसण, मोतीचूर लाडू साजूक तुपातले लाडू बनविले जात आहे.
दिवाळीनिमित्त घरोघरी पारंपरिक बेसणाचा लाडू, शंकरपाळी, चिवडा, भाजणीची चकली, बुंदी, साखर गुळाचे अनारसे, शेव, करंजी, बालूशाही, कलाकंद, गुलाबजामून अशा पदार्थाना अधिक पसंती दिली जात आहे.
—-
तयार फराळाला पसंती
नोकरदार, उद्योग, व्यापार, लघुउद्योग चालविणाऱ्या असो, की घरकामात व्यस्त असलेल्या महिलांना घरी पदार्थ बनविण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आता दिवाळीचा तयार फराळ खरेदीला अधिक पसंती दिली जात आहे. शहरात अनेक महिलागट तयार पदार्थ करुन देत आहेत. सध्या घरगुती तयार फराळालाही चांगली मागणी आहे.
—
‘दिवाळीचा फराळ तयार करण्याचे काम आठ दिवसापासून सुरु आहे. जशी मागणी असेल तसे पदार्थ बनवून दिले जातात. आमच्याकडे जास्त नोकरदार वर्गानी पदार्थ तयार करण्याची मागणी केली आहे. सध्या तेलासह डाळी व रसर्वच वस्तूंचे दर वाढले असले तरी ग्राहकांना गतवर्षीच्या किमतीप्रमाणेच फराळाची विक्री केली जात आहे.’
-जिजाबाई राऊत, गृह उद्योजिका, साखरवाडी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta