घरोघरी लक्ष्मीपूजन : शहरात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी
निपाणी (वार्ता) : गुलाबी थंडीत प्रसन्नतेची अनुभूती देणारे सनईचे मंगलमय सूर, दारासमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळांचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात सोमवारी (ता. २४) निपाणी शहर आणि परिसरात सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले. यानिमित्ताने घराघरांत, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्रीलक्ष्मीची, वह्या आणि खाते, पुस्तिकांची मनोभावे पूजा पार पडली अन् त्यानंतर मुक्तहस्ते झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन निघाला.
पहाटे अभ्यंगस्नान झाल्यावर देवदर्शन झाले. दिवाळीच्या आनंद लुटल्यावर नागरिकांनी आपल्या प्रियजनांसोबत गप्पाष्टक रंगविले. नागरिकांनी सकाळीच शहरातील बाजारपेठा गाठून लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले, कर्दळी आणि केळीची पाने व पूजाविधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीच्या कोंडीचे चित्र होते. सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. शहरातील अशोक नगर, कोठीवालेकॉर्नर, बेळगाव नाका, चिकोडी रोड परिसरातील दुकानेही आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती.
मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे उजळले अन् पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुटुंबीयांनी सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन केले. अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजनानंतर फराळाचा आस्वाद घेतला. तर पूजाविधीनंतर गूळ, लाह्या, बत्ताशासह मिठाईचे वाटप करत नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अन् फटाक्यांची मनमुराद आतषबाजी केली. तर शहरातील दुकान व घरांपुढे पाण्याचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची पूजा पार पडली. यानिमित्ताने शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
—-
एकाच दिवशी पाडवा अन् भाऊबीज
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ दिवस, तर कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज बहिणीने केलेले भोजन करून तिचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. दरम्यान यंदा पाडवा अन् भाऊबीजसुद्धा बुधवारी (ता. २६) एकाच दिवशी आल्याने नागरिकांत आनंद व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta