
निरभ्र आकाशामुळे स्पष्टता अधिक: विज्ञान प्रेमींनी घेतला आनंद
निपाणी (वार्ता) : देशात दिसणारे यंदाच्या वर्षातलं पहिलं व शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याची संधी मंगळवारी (ता.25) सायंकाळी निपाणीसह ग्रामीण भागात खगोल प्रेमींना मिळाली. आकाश निरभ्र असल्याने कोणताही अडथळा नसल्याने सूर्यग्रहण निरीक्षण अधिक चांगले करता आल्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांनी सांगितले.
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. दिवाळी सणाच्या सुट्टीमध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने निपाणी परिसरात विद्यार्थ्यांनी निरीक्षणाचा आनंद घेतला. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 2.28 ते सायंकाळी 6.32 पर्यंत होते. आजचे हे आंशिक सूर्यग्रहण सुमारे 4 तास 3 मिनिटे चालले असून आपल्या भगात 4:58 पासून 5:34 पर्यंत प्रतिबिंब स्वरूपात पाहता आले.
हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी चेंडूवर छोटा आरसा बसवून त्याव्दारे भिंतीवर सूर्याचे प्रतिबिंब घेऊन त्याचे निरीक्षण करण्यात आले. एक इंच त्रिजेच्या वर्तुळाचा साधारण 29%भाग चंद्राने व्यापलेला दिसून आल्याचे एस. एस. चौगुले यांनी सांगितले.
एरव्ही चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. पण आजच्या या सूर्यग्रहण स्थितीत सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो. त्याला ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ असं म्हणतात.
कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योग्य खबरदारी घेत सूर्यग्रहण निरीक्षणाचा आनंद विज्ञान प्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांनी घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta