रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली
कोगनोळी : 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा “राज्योत्सव” म्हणून साजरा केला जातो तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याचदिवशी “काळा” दिन म्हणून साजरा करतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी दूधगंगा पुलावर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही काळ रास्ता रोको करत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
याप्रसंगी “छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, आवाज कुणाचा शिवसेनेचा, बेळगाव विदर्भ भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाचं पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, बेळगाव आमचं आहे, गाव आमचं आहे. कारवार आमचं आहे, कर्नाटकामध्ये मराठीपण माणूस आहे. आम्ही नाही ऐकणार यांचं. ही मशाल बेळगाव जिल्ह्यामध्ये नक्कीच पोहोचणार असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, देशातील लोकशाही विशेषता या राज्यातील संपलेली आहे. या राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रामध्येही भाजपचे सरकार आहे. आज सगळीकडे अस्वस्था आहे. भाजपची दादागिरी आहे. म्हणून या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. मराठी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ताकद मिळाली पाहिजे आणि ती आम्ही देणारच असे त्यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, शहरप्रमुख दिलीप बेल्लूरकर, उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, संपर्कप्रमुख अरविंद नागनूरे, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, विभागप्रमुख रमेश माळवी, विजय सावंत यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्नाटक पोलीस ठाण्यातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी, पोलीस उपाधीक्षक बसवराज यलगार, मनोजकुमार नाईक, वीरेश गोडमणी, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार तर महाराष्ट्र पोलीस ठाण्याच्या वतीने कागलचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षका मोनिका खडके यांच्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातील शेकडो पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
Belgaum Varta Belgaum Varta