प्रा. डॉ. अच्युत माने : काळ्यादिनी मराठी भाषकांची बैठक
निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्नासाठी सनादशीर मार्गाने लढा देत असताना प्रशासकीय यंत्रणे कडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. घटनेनुसार सर्व भाषकांना बोलण्याचा अधिकार असूनही दडपशाही केली जात आहे. आतापर्यंत मराठी भाषिकांच्या तीन पिढ्या सीमा प्रश्नासाठी बरबाद झाल्या आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांची गेल्या साठ वर्षापासून घुसमट होत आहे. काश्मीर भारतात आले पण कर्नाटक सीमाभाग महाराष्ट्रात का जात नाही असा खडा सवाल करून सीमाप्रश्नाच्या अखेरच्या लढ्यात युवकांनी झोकून द्यावे, असे आवाहन प्रा. डॉ. अच्युत माने यांनी केले. मंगळवारी काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष जयराम मिरजकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खांबे, प्रा. भारत पाटील, प्रा. एन. आय. खोत, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा. माने म्हणाले, आज जागा आहेत राज्यकर्त्यांनी सीमा प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधींचे सोहळे होत असली तरी कामे मात्र झालेली नाहीत. अलीकडच्या काळात मराठी शाळा कुलूप पडत आहेत त्यामुळे मराठीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काळ्या दिण्यासाठी बेळगाव गावात परवानगी मिळते मग निपाणीत का मिळत नाही,असा सवाल त्यांनी व्यक्त केला. सध्या सर्वत्र भ्रष्ट व्यवस्था सुरू असून त्याला उध्वस्त करण्यासाठी मराठी भाषकांचा लढा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जयराम मिरजकर म्हणाले, सीमा प्रश्नासाठी लोकशाहीच्या मार्गाने लढा सुरूच तरीही सीमाभागातील मराठी बांधवावर वेगवेगळ्या पद्धतीने अजूनही अन्याय केला जात आहे. अजूनही काही नेते मंडळी सीमा प्रश्न सुटणार नसल्याच्या अफवा पसरवत आहेत. त्यावर मराठी भाषिकांनी विश्वास ठेवू नये. संयम आणि शांततेने हा लढा सुरूच राहणार आहे. आता न्यायालयाने लढाई सुरू असून त्यासाठी तरुणांची एकजूट महत्वाची आहे. न्यायालयासह राज्यकर्त्यांना मराठी भाषकांची मागणी डावलता येणार नाही. मुठभर कन्नडी आपली पोळी भाजून घेत असून त्यांना वेळीच रोखले पाहिजे. केवळ मराठी भाषिकांसाठीच कायदा न वापरता सर्वांसाठी समान कायदा वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.
बाबासाहेब खांबे यांनी, सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना नगरसेवकासह लोकप्रतिनिधी हजर राहणे आवश्यक होते. पण त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केल्याने याच्या निवडणुकीत मराठी भाषिकांनी मतदान करताना विचार करण्याची गरज जानेवारीला होणारा हुतात्मा दिन ही मोठ्या प्रमाणे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी सभापती विश्वास पाटील, किरण कोकरे, रमेश निकम, प्रशांत नाईक, नवनाथ चव्हाण, नंदकुमार कांबळे, सुशांत बुडके, लक्ष्मीकांत पाटील, पप्पू सूर्यवंशी, झुंजार दबडे, अशोक खांडेकर, उमेश भोपे, बाळासाहेब हजारे, सचिन सूर्यवंशी, संतोष पाटील, अवधूत खटावकर, निलेश पावले, शरद मळगे, आशिष मिरजकर, सुनील हिरूगडे, सुधाकर माने, बाबासाहेब मगदूम, जय सूर्यवंशी, उत्तम कामते यांच्यासह मराठी भाषिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta