ऊस दरासह नुकसान भरपाई मिळावी : राजू पोवार यांचा पुढाकार
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा. या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखर कारखान्यानी ५५०० दर द्यावा, या मागणीसाठी रयत संघटनेने आंदोलन केले. निर्णय होईपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
राजू पोवार म्हणाले, साखर मंत्र्यांच्या कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण तोडगा न निघाल्याने बेळगाव जिल्ह्यात निरंतरपणे रयत संघटनेतर्फे आंदोलन सुरू ठेवले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी संघटित राहून रस्त्यावर उतरले तरच ऊसाला चांगला दर मिळणार आहे. एफआरपीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना लुटण्याचे तंत्र अवलंबले आहे. अतिवृष्टी महापूर काळात पिकांचे नुकसान होऊनही निपक्षपातीपणे सर्वे न झाल्याने शेतकरी भरपाई पासून दूरच राहिला आहे. त्याशिवाय परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे. त्यामुळे तात्काळ ऊस दराचा तोडगा काढण्यासह पिकांची भरपाई न दिल्यास धारवाडमध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय शेतकरी राहणार नसल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी यंदाच्या हंगामातील ऊस दराबद्दल कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर कारखान्याचे प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणा व रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची चर्चा घडवून आणली.
आश्वासनाची पूर्तता न झाल्यास धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निरंतरपणे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, शिवानंद मोगलीहाळ, गणेश एळगे, रसंजू हवनावर, राजेंद्र नाईक, कुमार बोबटे, रमेश पाटील, उमेश भारमल, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, सुभाष देवर्षी, चिनू कुळवमोडे, रोहन पाटील यांच्यासह शेतकरी व रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta