व्यवसायिकाचा घेतला चावा : दुकानातील साहित्याचीही नासधूस
निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्याभरापासून निपाणी शहर आणि उपनगरात माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. थेट व्यवसायिकांच्या दुकानात शिरून साहित्याची नासधूस करण्यासह नागरिकांचा चावा घेत आहेत. गुरुवारी (ता.३) सकाळी तासगावकर गल्ली (नरवीर तानाजी चौक) येथील रमेश हेअर ड्रेसर्स या दुकानात शिरून माकडाने हैदोस घातला. त्याशिवाय प्रभाकर उर्फ मोतीलाल माने यांच्या पायाचा चावा घेतला आहे. त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने शहरवासीयातून भीती व्यक्त होत आहे.
सध्या शेतीवाडीत कोणतेही खाद्य मिळणे कठीण झाले. त्यामुळे वानरांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. आठवडाभरापासून शहरातील मुख्य बाजारपेठेत माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. काही माकड थेट दुकानात बसून दुकानातील टीव्ही, पंखा व इतर साहित्यांची नासधूस करत आहेत. त्यामुळे व्यवसायकांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. याशिवाय नागरिकांचा चावा घेत असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत आर्मी विभाग आणि नगरपालिकेला बऱ्याच वेळा नागरिकांनी कळविली आहे. पण दोन्ही विभागातर्फे आपली जबाबदारी झटकली जात आहे. त्यामुळे नागरिक कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी वन खाते व नगरपालिकेने मोकाट वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta