
कोरोना नियमांचे पालन करण्याची भूमिका : मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यकच
निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या लॉकडाऊनमध्ये निपाणी तालुक्याचा समावेश केला होता तरीही रुग्णसंख्या वाढतच गेली. अखेर स्थानिक प्रशासनाने निपाणी व परिसरातील किराणा दुकाने सलग पाच दिवस बंद ठेवली होती. त्यानंतर दुकाने सकाळी सहा ते दहा या वेळेत उघडण्यात आली. त्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी थोडाफार दिलासा मिळाला. पण सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून किराणा दुकाने ठराविक वेळेत उघडली तरी कोरोना संपला, असे आम्ही समजत नसून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनच आम्ही दैनंदिन व्यवहार करणार आहोत, अशी सकारात्मक भूमिका निपाणी शहरातील किराणा व्यवसायिकांनी घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांनीही प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
मागील 2 महिन्यांपासून कोरोनाने शहर आणि ग्रामीण भागात थैमान माजविले होते. दररोज रुग्ण संख्या वाढू लागल्याने शासनाने कडक निर्बंध जारी केले होते. शहरात अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर प्रतिष्ठाने बंद होती. त्यातही सणासुदी आणि लग्नसराईच्या काळात लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. एकूणच अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना दुकानाचे भाडे , वीजबिल आणि कामगारांचे पगार कसे द्यावे, अशी विवंचना सतावत होती. शिवाय स्वतःचा प्रपंच तरी कसा रेटावा, हा यक्षप्रश्नही होता. अर्थात शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांचा चांगला परिणाम दिसून आला. निपाणी तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट अवघ्या काही महिन्यात ओसरत असल्याचे आशादायक चित्रही निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने अनलॉकच्या प्रक्रियेला ग्रीन सिग्नल दाखवत कोरोना पॉझिटिव्हीटी दर आणि उपलब्ध खाटा हा निकष समोर ठेऊन व्यवसाय निहाय निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवा व किराणा दुकान व्यतिरिक्त लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कार विधीला निर्बंध लागू राहणार आहेत. अर्थात शहरात काही व्यवसायिकांमध्ये शिथिलता आणली आहे तरी सर्व काही कोरोना प्रतिबंधक नियमांना अधीन राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने व्यवसायिकांना दिले आहेत.