ननदी (प्रतिनिधी) : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी हद्दीमधील मिरजी कोडी वस्तीमध्ये आयटी इंडस्ट्री या कोंबडी खाद्य व कोंबडीची पिल्ले तयार करणाऱ्या फॅक्टरीच्या सांडपाण्यामुळे तसेच दुर्गंधीमुळे परिसरातील पिण्याचे पाणी प्रदूषण व हवेच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रदूषणामुळे लहान मुले व वृद्धांना घशाचा आजार व भूक न लागणे यासारखे भयंकर त्रास होत आहेत. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रदूषित परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे विचारणा केली असता परवाना दिला आहे किंवा नाही याची उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच कंपनी मालकांना जाब विचारला असता तुम्ही आम्हाला विचारायचे नाही पंचायतीला विचारा पंचायतीने आम्हाला रीतसर परवाना दिला आहे असे दादागिरीची उत्तर देत आहेत. या प्रदूषणामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, अशी लिखित तक्रार तालुका पंचायत चिक्कोडी, ग्रामपंचायत हिरेकोडी, आरोग्य विभाग चिक्कोडी, पशुपालन विभाग चिक्कोडी यांना देऊन देखील शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असा थेट आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. यावर त्वरित निर्णय न झाल्यास ग्रामपंचायतीला घेराव घालण्याचा निर्णय परिसरातील नागरिक येणार आहेत, असे परिसरातील नागरिकांनी वृत्तप्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली आहे.