
बेळगाव : सावगाव येथील सरकारी मराठी उच्च मुला-मुलींच्या शाळेच्या इमारतीत कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या हालचालींमुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवित कन्नड शाळेसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या हा आधीच चिंतेचा विषय असताना, एकाच इमारतीत दोन वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळा चालविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचे नागरिकांचे मत आहे. मराठी शाळेच्या उपलब्ध पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरणावर याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा असल्यामुळे मराठीसह मातृभाषेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत मराठी शाळेच्या इमारतीत दुसऱ्या माध्यमाची शाळा सुरू करणे म्हणजे मराठी शाळेच्या अस्तित्वालाच धक्का देण्यासारखे असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
एकाच परिसरात दोन माध्यमांच्या शाळा भरविल्यास वर्गखोल्यांची कमतरता, वेळापत्रकातील अडचणी, विद्यार्थ्यांची गैरसोय तसेच प्रशासकीय व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी स्वतंत्र इमारतीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील नागरिक, पालक आणि आजी-माजी विद्यार्थी एकत्र येत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार असून मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta