गांधी रुग्णालयाला दिले वैद्यकीय साहित्य : कोरोना रुग्णांची झाली सोय
निपाणी (संजय सूर्यवंशी) : येथील शासकीय महात्मा गांधी रुग्णालयामधील कोरोना रुग्णांसाठी निपाणी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकून मदतीचा हात दिला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार येथील पोलिसांच्यावतीने गांधी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी कोविड उपचार किट व साहित्याची मदत देण्यात आली. खाकी वर्दीतल्या पोलिसांच्या या उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील वीण आणखीन घट्ट झाली आहे. पोलिसांच्या या माणुसकीचे निपाणी आणि परिसरात कौतुक होत आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने सध्या बेळगाव जिल्ह्यात व तालुका पातळीवरील रुग्णालयांसाठी विशेष करून तालुकास्तरावर असलेल्या सरकारी रुग्णालयात कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य प्रशासनावरील वाढता ताण व वेळेत औषधे तसेच कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता होण्यास अडचण येऊ नये, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रशासनाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबवला आहे. त्या आधारे निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी निपाणी पोलिस प्रशासनाच्यावतीने कोविड रुग्णांच्या उपचारासाठीचे साहित्य किट भेट देण्यात आले. या किटमध्ये विविध प्रकारचे इंजेक्शन, गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिजन कॉन्स्टंट मशिन यासह उपचारासाठी लागणाऱ्या सर्व साधनांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच जिल्हा पोलिस प्रशासनाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून तालुकास्तरावरील सरकारी रुग्णालयांसाठी अशा प्रकारचे साहित्य दिल्याने आता सरकारी रुग्णालयात असलेल्या सेंटरसाठी ही बाब महत्त्वपूर्ण व सोयीची ठरली असल्याचे मत डॉ. गणेश चौगुले यांनी व्यक्त केले.
यावेळी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी महात्मा गांधी रुग्णालय कोविड सेंटर व इतर बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, डॉ. संतोष घाणीगेर, डॉ. संतोष चौगुले यांच्यासह पोलिस कर्मचारी व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.