सामान्यांच्या खिशाला कात्री : सायकलींचा वापर वाढणार
निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाउनसह अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. असे असले तरी पेट्रोलची दरवाढ मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. सातत्याने दरवाढ होत असून पेट्रोलने सोमवारी (ता.14) 100 रूपयावर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. शिवाय सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. सर्वत्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. ते ठप्प असतानाही पेट्रोल दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाही. सध्या निपाणी शहरात पेट्रोल 100 रुपये पैसे प्रतिलिटर तर पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर 100 रुपये 2 पैसे दराने विक्री होत आहे. त्यातही काही भागांत पेट्रोलच्या किमतीतही काही पैशांची तफावत आढळून येत आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी दुचाकीवर भाजीपालासह विविध व्यवसाय थाटले आहेत. आता पेट्रोलच शंभरावर पोहोचल्याने व्यवसाय करावा तरी कसा, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. २००९ मध्ये ४४ रुपये ५५ पैसे प्रतिलिटर दराने मिळणारे पेट्रोल आता 100 रुपयांनी खरेदी करावे लागत आहे.
मूळ किमतीपेक्षा कर जास्त
पेट्रोलवर कोणताही स्थानिक कर लावला जात नाही. मात्र केंद्र व राज्य शासनाकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ करांमुळे पेट्रोलची मूळ किमतीपेक्षा अधिक पटींनी विक्री होत आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत ३८ रुपये १० पैसे आहे. त्यात एक्साईज ड्युटी ३२ रुपये ९८ पैसे, राज्य शासनाचा टॅक्स २६ रुपये २६ पैसे, डीलरचे कमिशन ३ रुपये ४१ पैसे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पेट्रोलवरील कर कमी केल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.
‘सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर जास्त फिरणे शक्य नाही. मात्र पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरु झाले की सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तेव्हा पेट्रोलही जास्त लागेल आणि सगळेच बजेट कोलमडून जाईल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत. अन्यथा सायकलशिवाय पर्याय राहणार नाही.’ – अजित बक्कन्नावर, संभाजीनगर निपाणी