सतीश जारकिहोळी यांचे सहकार्य : तीन पोलिस ठाण्याचा समावेश
निपाणी : कर्नाटक राज्य काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांच्यातर्फे कोरोना काळात फटका बसलेल्या गरजूंना मदत करण्यासह कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेल्या पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वितरणाचा उपक्रम सुरू आहे. त्याप्रमाणे निपाणीतही शहर, ग्रामीण, बसवेश्वर चौक आणि मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रविवारी (ता.13) सायंकाळी मास्क व सॅनिटायझर वितरण केले. माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे यांनी मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर सुपूर्द केले. लक्ष्मण चिंगळे यांनी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी कोरोना काळात लाखो गरजूंना जीवनावश्यक वस्तू किटसह विविध प्रकारे सहकार्य केले आहे. तसेच कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेल्या पोलिसांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मास्क व सॅनिटायझर दिले जात असल्याचे सांगितले. यावेळी शहर पोलिस स्थानक, ग्रामीण पोलिस स्थानक, बसवेश्वर चौक पोलिस स्थानक व मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर दिले. मंडल पोलिस निरीक्षक शिवयोगी म्हणाले, वैद्यकीय मंडळी संरक्षक किटसह दिवसरात्र कार्यरत आहेत. मात्र अशा कोणत्याही किटशिवाय राष्ट्रीय महामार्गसह शहर आणि ग्रामीण भागात कोरोना काळात पोलिस कार्यरत आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझर वितरण करणे योग्य आहे. यावेळी शहर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, ग्रामीणचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, माजी नगरसेवक संदीप चावरेकर, श्रीनिवास संकपाळ, दीपक ढणाल, बाळासो कमते, संदीप इंगवले, प्रदीप सातवेकर, अवधुत गुरव, प्रशांत हांडोरी, बिरू मुधाळे, संदीप घोरपडे, शेखर असोदे, संदीप गाडीवड्डर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.