बेळगाव : बेळगाव शहराला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वॅक्सिन डेपोमध्ये वृक्षारोपण करत बेळगाव शिवसेनेच्या सेव्ह वॅक्सिन डेपो मोहिमेत सहभाग दर्शवला आहे.
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाचे आणि पर्यावरण दिन युवा सेना अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवारी बेळगावातील शिवसैनिकांनी वॅक्सिन डेपोत वनमहोत्सव साजरा केला.
भर पावसात वॅक्सिन डेपोत झाडे लावत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वॅक्सिन डेपो वाचवा आंदोलनात एक प्रकारे सहभाग घेतला आहे.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो येथे आज शनिवारी सकाळी सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, शिवसेना आरोग्य सेवा केंद्राचे अध्यक्ष दत्ता जाधव, सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ आणि चंद्रकांत कोंडुसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनीही व्हॅक्सिन डेपो परिसरात विविध प्रकारची झाडाची रोपे लावली.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनामागे ‘व्हॅक्सिन डेपो बचाव’ मोहिमेला पाठिंबा देणे हा देखील एक उद्देश होता. याप्रसंगी शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, सागर पाटील, राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, सुनील बोकडे, विश्वनाथ येळ्ळूरकर, विनायक जाधव, प्रदीप सुतार, उदय पाटील, मारुती परीट, महेश गावडे, आदींसह बरेच शिवसैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta