संकेश्वर (प्रतिनिधी) : नुकतीच गोकाक माऊराई देवस्थान सभाभवनमध्ये अखिल कर्नाटक गोंधळी समाजाची सभा घेऊन त्यात नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान अखिल कर्नाटक गोंधळी समाजाचे राज्याध्यक्ष विठ्ठल गणाचार्य यांनी भूषविले होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सभा घेऊन बेळगांव जिल्हा गोंधळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बेळगांव जिल्हा गौरवाध्यक्षपदी सिध्दप्पा इंगवे तर बेळगांव जिल्हा गोंधळी समाज अध्यक्षपदी संकेश्वरचे युवानेते संदिप हरीभाऊ गोंधळी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी बेळगांव खानापूरचे रमेश सिंगद, सौंदतीचे वासूदेव गोंधळी, प्रधानसचिवपदी गोपाल भिसे (बेळगांव), संघटना सचिव म्हणून शंकर काळे (हुक्केरी), सहसचिव विजय दवडते (चिकोडी), खजिनदार नारायण अडेकर (निपाणी) आणि अकरा तालुक्यातील सात जणांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी गोंधळी समाजाचे राज्य उपाध्यक्ष एम.बी.शास्त्री, बेळगांवचे सुहास भिसे, नागराज भोगले, आनंद सिंगनाथ, राघवेंद्र शास्त्री, राजशेखर वाकरे, महिला घटक राज्य उपाध्यक्ष श्रीमती उपासना गारवे, सौंदती, हुक्केरी, बेळगांव, मुडलगी, गोकाक, रायबाग, रामदुर्ग, निपाणी, चिकोडी बैलहोंगल, खानापूर तालुक्यातील गोंधळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणार
अखिल कर्नाटक गोंधळी समाज संघटना कर्नाटक राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ गोंधळी समाज बांधवांना मिळवून देण्याचे कार्य करीत असल्याचे बेळगांव गोंधळी समाजाचे नूतन अध्यक्ष संदिप गोंधळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने कर्नाटक अलेमारी, आरे अलेमारी अभिवृद्धी निगम बेंगळूरला जास्तीतजास्त निधी मिळवून देण्याची आवश्यकता आहे. गोंधळी समाजाचा भटकंती जाती जमातीत समावेश असला तरी केंद्र सरकारच्या पॅकेजचा लाभ अद्याप समाज बांधवांना मिळालेला नाही. त्यासाठी संघटनेचे प्रयत्न जारी असल्याचे त्यांनी सांगितले.
