संकेश्वर (महंमद मोमीन) : मायबाप सरकारला नदी काठच्या लोकांची फिकीर नसल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकानदार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठचे लोक पावसाळा सुरु झाल्यामुळे काळजीत दिसत आहेत. कारण यंदा पाऊस जादा कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्य सरकारने हिरण्यकेशी नदीतील वाळू उपसाला परवानगी दिली नाही आणि संकेश्वर पालिकेने अद्याप नदी-नाले साफ केलेले नाही. त्यामुळे नदी काठच्या लोकांना महापुराची भिती लागून राहिलेले दिसत आहे. पालिकेने मोठा पाऊस कोसळण्यापूर्वी नदी-नाले साफ करण्याचे काम हाती घेण्याची आवश्यकता आहे. नदीचे पात्र वाळू, माती केरकचऱ्याने अर्धेअधिक भरुन राहिलेले दिसत आहे. गंगा-गौरी ओढा केरकचरा, मातीचे ढिगाराने आणि झाडाझुडुपांने भरुन गेलेला दिसतो आहे. त्यामुळे पालिकेला आता नाला शोधण्याची वेळ आलेली दिसत आहे. संकेश्वर हिरण्यकेशी नदीला पूर्वी महापुराचा फारसा धोका नव्हता. अलिकडे हिरण्यकेशी नदीला वर्षाला महापुराची भिती लागून राहिलेली दिसत आहे. कारण नदी-नाले केरकचऱ्याने भरुन गेलेले दिसत आहेत. नदी-नाले केरकचरा वाळू-माती आणि झाडाझुडुपांने भरुन राहिल्याने हिरण्यकेशी नदीला महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापुराचे पाणी मठ गल्ली, नदी गल्ली, हरगापूर गल्ली, ढोर गल्लीतील घरांत शिरकाव करते. त्यामुळे नदी लगतच्या लोकांना आता वर्षागणिक पावसाळ्यात महापुराच्या भितीने घरदार सोडावे लागत आहे. नदी लगतची घरे जुनी-जिर्ण झालेली असल्याने घरांची पडझड देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.यावर उपाय एकच आहे तो म्हणजे नदी-नाले साफ करणे होय. हे काम जोपर्यंत मायबाप सरकार,संकेश्वर पालिका करत नाही. तोपर्यंत महापुराचा धोका अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.
