संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यावर कत्ती गटाने सातत्याने सहाव्यांदा सत्ता कायम ठेवल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी आज कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, १९९५ मध्ये पार पडलेल्या हिरण्यकेशी साखर कारखाना निवडणुकीत कारखाना सभासदांनी आम्हाला आशीर्वाद केला. सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून गेल्या २७ वर्षात कारखाना चांगला चालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर देण्याचे काम केले आहे. गेल्या २७ वर्षात सहा निवडणुका पार पडल्या पैकी तीन निवडणुकीत विजयी संपादन केले. तीन निवडणुकीत संचालक मंडळाची अविरोध निवड करण्याचे कार्य केले आहे. यंदा कारखान्याला ऊस पुरवठा उत्तम झाल्याने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत ८ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याबरोबर संगम सहकारी साखर कारखाना हिडकल डॅम, बेल्लद बागेवाडी येथील विश्वराज शुगर्स उत्तम चालवून दाखविण्याचे कार्य आम्ही करीत आहोत. सहकार क्षेत्राची परिस्थितीत बिकट आहे. सहकार क्षेत्र वाचविण्याचे कार्य केंद्रीय मंत्री अमित शहा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिरण्यकेशीचे नूतन संचालक मंडळ
नुकत्याच पार पडलेल्या हिरण्यकेशी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत मंत्री उमेश कत्तीं, माजी खासदार रमेश कत्ती गटाचे अकरा सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. नूतन संचालक मंडळात चौघा नवख्यांची वर्णी लागली आहे. त्यांची नावे अशी अशोक बसवंतप्पा पट्टणशेट्टी (हुक्केरी) बसप्पा लगमप्पा मरडी (कोटबागी), प्रभूदेव बसगौडा पाटील (अंम्मीणभांवी), सुरेंद्र शंकर दोडलिंगण्णावर (यल्लीमन्नोळी), जुने जाणते संचालक बाबासाहेब परप्पा आरबोळे (मुगळी तालुका गडहिंग्लज), बसवराज शंकर कल्लट्टी (नोगनीहाळ), निखिल उमेश कत्तीं (बेल्लद बागेवाडी), शिवनायक विरभद्र नाईक (कोचरी), श्रीशैल्यप्पा बसवाणेप्पा मगदूम (घोडगेरी), सुरेश बसलिंगप्पा बेल्लद (कब्बूर) तर बी गटातून संकेश्वरचे उद्योजक शिवपुत्रप्पा ऊर्फ अप्पासाहेब शिरकोळी यांची वर्णी लागली आहे. नूतन संचालक मंडळाची घोषणा येत्या ७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या सभेत केली जाणार असून त्याचदिवशी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे.
चौघांना गेटपास
हिरण्यकेशी साखर कारखाना संचालक मंडळातून प्रल्हाद पाटील, राजकुमार पाटील, राजेंद्र पाटील, उदयकुमार देसाई यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट असल्याने कारखाना संचालक मंडळात महाराष्ट्रातून तिघांची वर्णी लागायची यावेळी मात्र दोघांना डच्चू देऊन फक्त बाबासाहेब आरबोळे यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, सभापती सुनिल पर्वतराव, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, चेतन बशेट्टी, अनेक मान्यवर उपस्थित होते.