संकेश्वर (प्रतिनिधी) : कॅन्सरला घाबरु नका. त्यावर प्रभावी औषधोपचार आहेत. कर्करोगाचे वेळीच निदान झाले की धोका टाळता येणे शक्य असल्याचे बेळगांव जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी सांगितले. ते संकेश्वर शासकीय रुग्णालय, एनसीडी घटकतर्फे आयोजित कॅन्सर डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपस्थितांचे स्वागत विक्रांत रायप्पगोळ यांनी केले. कॅन्सर डे कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहूणे डॉ. एस. व्ही. मुन्याळ, संकेश्वर शासकीय रुग्णालयाचे वैद्याधिकारी डॉ. दत्तात्रय दोडमनी, डॉ. पौर्णिमा तल्लूर, डॉ. शामला पुजार, डॉ. शारदा के. वाय, डॉ. एस. बी. ओंकार, डॉ. रमेश यांच्या हस्ते वृक्षरोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
डाॅ. एस. व्ही. मुन्याळ पुढे म्हणाले, कॅन्सरला घाबरुन चालणार नाही. त्याचा ताकदीने मुकाबला करायला कॅन्सर रुग्णांनी सिध्द झाले पाहिजे. आज कर्करोगावर अनेक प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. कॅन्सर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे घेऊन कॅन्सरवर मात करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. रश्मी यांनी तोंडाचे कॅन्सर, स्तन कॅन्सरविषयीची माहिती सांगितली. कार्यक्रमाला मलाप्पा कोटाल, अण्णागौडा पाटील, संकेश्वर कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि संकेश्वर पॅरामेडिकल काॅलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डी. एच. बिरगौडर यांनी मानले.