संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे सहकार महर्षी, कर्मयोगी बसगोडा पाटील यांची पहिली आणि दुसरी पुण्यतिथी साधेपणाने आचरणेत आली. तिसरी पुण्यतिथी येत्या रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी बेळगांव जिल्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आचरणेत येणार असल्याची माहिती माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी एसडीव्हीएस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले सहकार शिल्पी, शिक्षणप्रेमी बसगौडा पाटील यांनी आपले जीवन समाजाला समर्पित केले होते. आपल्या परिवारापेक्षा ते समाजाचे चिंतन करायचे.समाजासाठी झटणारे बसगौडा पाटील यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रात केलेले कार्य आदर्श ठरले आहे. त्यांच्या कार्याचा परिचय आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची तिसरी पुण्यतिथी समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आचरली जात आहे. आजकाल घरातील ज्येष्ठ नागरिकांना आदरभाव दिला जात नाही. बसगौडांची पुण्यतिथी सर्वांना प्रेरणादायी ठरावी यासाठी ज्येष्ठांचा सन्मान केला जात आहे. बसगौडा पाटील यांनी वयाच्या १६ व्या वर्षी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. माजी मंत्री दिवंगत एम. पी. पाटील हे बसगौडांचे प्रेरणास्थान राहिले. सहकार महर्षी अप्पणगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बसगौडांनी शिक्षण, सहकार आणि कृषी क्षेत्रात भरीव असे कार्य करुन दाखविले आहे. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना असो, एपीएमसी, तालुका मार्केटिंग सोसायटी, घटप्रभा जे.जे. हाॅस्पिटल उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आपला ६१ वा वाढदिवसाला जमा झालेले पैसे शिक्षण संस्थेला आणि अमृतमहोत्सवी वाढदिवस समारंभाला जमा झालेल्या पैशातून त्यांनी निडसोसी हिरा शुगर तांत्रिक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली आहे. हुक्केरी तालुक्यात अनेक शिक्षण संस्था उभा करण्याचे काम करताना त्यांनी कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचे कार्य केले आहे.
शिक्षण कृषी हीच देवालय
बसगौडा पाटील हे देवावर श्रद्धा ठेवणारे असले तरी त्यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रातच देवालय पाहिले. शिक्षण आणि कृषी क्षेत्रातून समाज प्रगतीपथावर नेत्याचे कार्य त्यांनी करुन दाखविले आहे.
सुपुत्र होण्याचा अभिमान-सहकार महर्षी बसगौडांचं आपण ज्येष्ठ सुपुत्र असल्याचा मोठा अभिमान वाटतो. वडीलांच्या पुण्याईने आपणाला शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
यावेळी एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. जी. एस. इंडी, निडसोसी एस.जे.डी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निरंजनगौडा पाटील, एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे संचालक गंगाधर मुडशी, बसनगौडा पाटील, कार्यदर्शी डॉ. बी. ए. पुजारी, उपस्थित होते.