संकेश्वर (प्रतिनिधी) : एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास आम्ही बंदी केलेली नाही. पण वर्गात हिजाब घालण्यास मनाई केल्याचे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, हिजाब हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे इष्ट ठरणार नाही. आमच्या महाविद्यालयात हिजाब परिधान करून प्रवेश करु पहाणाऱ्या मुलींना पोलीसांनी मज्जाव केला आहे. त्यात चुकीचे असे कांहीं घडलेले नाही.
हिंदू-मुस्लीमांत हिजाबने वाद
घटनेत सर्व धर्मियांना आपल्या धर्माचे आचरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. असे असताना हिजाबचा वाढ कशासाठी हेच समजेनासे झाले आहे. मुस्लीम समाजातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थीनी हिजाब परिधान करून येतात वर्गात प्रवेश करतांना हिजाब काढून ठेवतात आणि वर्गात प्रवेश करतात. त्याला कोणाचाच विरोध नाही. अलिकडे वर्गात हिजाब घालून प्रवेश करण्याचा प्रकार सुरु झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शाळा-महाविद्यालयांत समान पोषाख असावा याकरिता ड्रेसकोडची सक्ती आहे.
मुस्लीम समाज बांधवांना मान्य
आपण काल मुस्लिम समाज बांधवांशी बातचीत करुन हिजाबचा विषय समजावून सांगितला आहे. हिजाब हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संयमाने राहणेतच शहाणपण असल्याचे त्यांना पटवून दिले आहे. भारतात आजपावेतो सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. अलिकडे कांहीं लोक जातीयवाद निर्माण करुन आजच्या युवापिढीत तेढ निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांना वेळीच रोखण्याचे कार्य प्रत्येकाकडून होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.