नागपूर : भारतानं नागपूरचा दुसरा टी20 सामना जिंकून मोहालीतल्या पराभवाचं उट्ट काढलं. आधी अक्षर पटेलनं गोलंदाजीत कमाल केली आणि मग रोहित शर्मा एका बाजूनं किल्ला लढवत भारताला निर्णायक विजय मिळवून दिला. ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना 8-8 ओव्हरचा खेळवण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियानं दिलेलं 91 धावांचं आव्हान भारतानं अखेरच्या ओव्हरमध्ये 6 गडी राखून पार केलं. रोहित शर्माची इनिंग भारताच्या विजयात निर्णायक ठरली. त्यानं अवघ्या 20 बॉल्समध्ये 4 फोर 4 सिक्ससह नाबाद 46 धावा फटकावल्या.
पण मधल्या ओव्हर्समध्ये लेग स्पिनर ऍडम झॅम्पानं राहुल, विराट आणि सूर्यकुमारला माघारी धाडून सामन्यात रंगत आणली. पण अखेर रोहित आणि दिनेश कार्तिकनं विजयी सोपस्कार पूर्ण केले. अखेरच्या ओव्हरमध्ये 9 धावा हव्या असताना दिनेश कार्तिकनं 1 फोर आणि एक सिक्स ठोकून सामना भारताच्या खिशात घातला. दरम्यान या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
वेडची बॅट पुन्हा तळपली
त्याआधी मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 8 ओव्हरमध्ये 90 धावा स्कोअर बोर्डवर लावता आल्या. वेडनं मोहालीतल्या पहिल्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यानं 19 बॉलमध्ये नाबाद 43 धावा फटकावल्या. तर कर्णधार फिंचनं 31 धावांचं योगदान दिलं. भारताकडून अक्षर पटेल पुन्हा एकदा प्रभावी ठरला. त्यानं आपल्या दोन ओव्हरच्या स्पेलमध्ये 13 धावा देताना कॅमेरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल या धोकादायक फलंदाजांना माघारी धाडलं.
अडीच तासांनी सामन्याला सुरुवात
दरम्यान आऊटफिल्ड ओली असल्यानं हा सामना नियोजित वेळेच्या तब्बल अडीच तास उशीरानं सुरु झाला. सात वाजता सुरु होणारा सामना 9.30 वाजता सुरु झाल्यानं नागपूरकरांना 8-8 ओव्हर्सचाच सामना पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानात आऊटफिल्ड ओली झाली होती. पण मैदान कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे सामना सुरु करण्यात यश आलं.
Belgaum Varta Belgaum Varta