बीसीसीआयकडून अधिकृत माहिती
नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषकाला मुकणार अशी माहिती याआधी समोर आली होती, पण आता बीसीसीआयनं अधिकृतरित्या हे जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेआधी बुमराह दुखापत वाढल्यामुळे संघाबाहेर झाला होता. ज्यानंतर आता तो विश्वचषकातूनही बाहेर झाला आहे.
बुमराहला पाठीची दुखापत
29 सप्टेंबर रोजी समोर आलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात तो खेळणार नसल्याचं पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं. बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दरम्यान बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी योग्य वेळ दिला न गेल्याने तो आता पुढील काही महिने सामने खेळू शकणार नाही असं दिसून येत होत, ज्यानंतर आता तो संपूर्ण टी20 विश्वचषकाला मुकणार हे समोर आलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta