इंदोर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील अखेरचा सामना आज इंदोरमध्ये रंगणार आहे. भारताने गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसर्या टी20 सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. पण व्हाईट वॉश देण्याकरता अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे.
आगामी टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही टी20 मालिका एक प्रकारचे सराव सामने असल्याने भारताला चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. त्यानुसार भारताने चमकदार कामगिरी नक्कीच केली. भारताने आधी ऑस्ट्रेलियाला तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने मात दिली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारत पहिल्या सामन्यापासून कमाल फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिला सामना 8 विकेट्सच्या फरकाने भारताने जिंकल्यानंतर दुसरा सामना भारताने 16 धावांनी जिंकला. यावेळी आधी फलंदाजी करत भारताने 237 धावांचा डोंगर उभारत दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धाावंचे आव्हान ठेवलं. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉक आणि मिलर जोडीने अप्रतिम खेळ दाखवत कडवी झुंज दिली. पण ते 20 षटकांत 221 धावाच करु शकल्याने भारत 16 धावांनी सामना जिंकला. आता अंतिम टी20 जिंकून व्हाईट वॉश भारत देऊ इच्छित आहे. तर दक्षिण आफ्रिका मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल.
Belgaum Varta Belgaum Varta