होबार्ट : टी20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीचा आज शेवटचा दिवस आहे. पात्रता फेरीत अ गटातून श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांनी सुपर 12 गटात एन्ट्री केली आहे. पण ब गटात मात्र दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आहे. हा संघ आहेे वेस्ट इंडिज. ब गटात आयर्लंडनं आज वेस्ट इंडिजला जोरदार धक्का देताना कॅरेबियन संघाचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला आणि सुपर 12 फेरी गाठली. पण वेस्ट इंडिजला मात्र टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पात्रता फेरीतून गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे विंडीज क्रिकेटमधल्या उणी वा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
आयर्लंडनं केली कमाल
ब गटात पहिल्या दोन सामन्यांनंतर प्रत्येक संघानं एकेक सामना जिंकला होता. त्यामुळे तिसरा सामना जिंकणारा संघ थेट सुपर 12 मध्ये प्रवेश करणार अशी स्थिती होती. सकाळच्या सत्रात वेस्ट इंडिजची गाठ पडली ती आयर्लंडशी. वेस्ट इंडिजनं या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण ब्रेंडन किंग वगळता विंडीज संघातला एकही फलंदाज फार मोठी खेळी करु शकला नाही. किंगनं 62 धावांची खेळी केली. त्याच खेळीमुळे विंडीजला 5 बाद 146 धावा करता आल्या. पण त्यानंतर आयर्लंडनं वेस्ट इंडिजनं दिलेलं लक्ष्य 18 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केलं आणि विंडीजचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगनं नाबाद 66 धावा केल्या. तर विकेट किपर बॅट्समन टकरनं नाबाद 45 धावांची खेळी केली.
दोन वेळचे चॅम्पियन स्पर्धेबाहेर
टी20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे ज्याने ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. 2012 आणि 2016 साली विंडीज संघानं डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. पण त्यानंतर गेल्या वर्ल्ड कपमध्ये दिग्गजांचा भरणा असूनही विंडीजला बाद फेरी गाठता आली नाही. आणि यंदा तर स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच क्वालिफाईंग राऊंडमधूनच हा संघ स्पर्धेबाहेर पडला.
Belgaum Varta Belgaum Varta